इंटरनेट विषयावरचं पाहिलं शैक्षणिक मराठी त्रैमासिक ‘इंटरनेट गुरु’
खरंतर इंटरनेट हा विषय नाही तर ते एक मध्यम आहे. जीवनातील अनेक व्यवहारांचे माध्यम. कोणताही विषय शिकण्याचं माध्यम. इंटरनेट म्हणजे एक जगण्याचं साधनही आहे. दैनंदिन अनेक गरजा पूर्ण करण्याचं माध्यम. थोडक्यात वैयक्तिक कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आदी अनेक गरजांची इंटरनेटद्वारे पूर्तता होत असते. अशा असंख्य गरजांची पूर्तता करीत असताना इंटरनेटचा वापर कसा करतात? येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्यात? इंटरनेटविषयी मनात निर्माण होणारे इतर प्रश्न. त्यांची उत्तरे. विविध क्षेत्रात वापरले जाणारे इंटरनेट. इंटरनेटचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य याविषयी उत्कंठा वाढवणारी माहिती. इंटरनेटचे चांगले वाईट परिणाम. आणि सारं काही आम्ही या मासिकातून सांगणार आहोत. तुम्ही इंटरनेट वापरत असाल किंवा नसालसुद्धा. पण सर्वांसाठी सारं काही आम्ही देणार आहोत. शिकविणार आहोत. ईमेल पाठवणे आणि तासानतास फेसबूक, व्हॉट्सअप-वर वेळ वाया घालवणे एवढ्यापुरते इंटरनेट मर्यादित नाही. तर त्यापुढे ते खुप मोठे आहे. योग्य वापर झाला तर इंटरनेट हा एक चांगला मित्र आहे. उत्तम गुरु आहे. आणि चुकीच्या पद्धतीने वापर केला तर तो राक्षसही आहे. इंटरनेटला काय बनवायचं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती पण साऱ्या प्रवृत्तींना इंटरनेट पुरून उरले आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इंटरनेटकडे आहे. इंटरनेटचे स्वरूप काल होते ते आज नाही आणि आज आहे ये उद्या असणार नाही. रोज टेक्नोलॉजी बदलत असते. रोज नवीन काहीतरी येत असते. सर्वच क्षेत्रांशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत कि त्या इंटरनेटशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. म्हणून इंटरनेट माहीत असणे. ते वापरता येणे खूप गरजेचे झाले आहे. म्हणूनच आम्ही सामान्य व्यक्तीच्या दृष्टीने इंटरनेट शिकून ते वापरणे सोपे होण्यासाठी साऱ्या गोष्टी सांगणार आहोत.
‘इंटरनेट गुरू’ मासिकाचा उद्देश : वाचा इंटरनेट, शिका इंटरनेट, वापरा इंटरनेट !
इंग्रजी मध्ये ज्याला इनफॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (Information Communication Technology ) म्हणतात. तेच आय.सी.टी. (ICT) ज्याला मराठीत माहिती संप्रेषण तंत्रज्ञान म्हणतात. माहिती मिळविणे, ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविणे, त्या माहितीचा उपयोग करणे म्हणजे माहिती संप्रेषण. यासाठी फोन, रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्रे अशी अनेक प्रचलित माध्यमे आहेत. पण माहिती संप्रेषणाच्या प्रचलित अशा अनेक माध्यमांमध्ये अत्यंत प्रभावी ठरलेले इंटरनेट हे एकमेव मध्यम आहे. साधन आहे. ज्यामध्ये सारे काही आहे. तुम्हाला हवे ते सारं. अक्षरशः सारं. तुम्हाला माहीतच आहे कि मुठभर म्हणजे थोडे. असेच आजपर्यंत आम्ही समजत आलो आहे. काहीतरी मुठीत ठेवणे. झाकून ठेवणे. झाकली मुठ. कोणालातरी मुठीत ठेवणे. असे काही शब्दप्रयोग आपण नेहमी ऐकतो. पण याच मुठीत आता सारे विश्व सामावले आहे. एखादी गोष्ट मिळविण्यासाठी आता कुठे दूर जायला लागत नाही. जगण्यासाठी ज्या गरजा असतात, ज्या सुख-सोयी हव्या असतात त्यासंबंधित सर्व गोष्टी आज इंटरनेटच्या माध्यमातून मिळतात. मला एखादी गोष्ट माहित आहे म्हणजे मला त्या गोष्टीचे ज्ञान आहे असे म्हणतात. ते ज्ञान मला माहिती साम्प्रेशानाच्या एखाद्या माध्यमातूनच मिळालेले. असते. कुणीतरी सांगितलेले असे. कुणीतरी शिकविलेले असते. कुठेतरी वाचलेले असते. कुठेतरी पाहिलेले असते. किंवा कुठेतरी ऐकलेले असते. या न त्या मार्गाने मला ते ज्ञान मिळालेले असते. मला मिळालेले हे ज्ञान मी दुसऱ्या कुणालातरी सांगतो, शिकवतो म्हणजे माहिती संप्रेषण. मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करणे ही त्यापुढची पायरी आहे. जीवनात उपयोग होणारे ज्ञान मिळवणे म्हणजे खरे शिक्षण. डिग्री डिप्लोमा म्हणजे ज्ञान अशी एक समजूत झाली आहे. उच्च शिक्षित म्हणजे ज्ञान असेही नव्हे. काही असो. शाळेला जाऊन ज्ञान मिळते. पुस्तके वाचून ज्ञान मिळते. सिनेमा पाहून ज्ञान मिळते, प्रवास करून ज्ञान मिळते. फिरायला जाऊन ज्ञान मिळते. खेळ खेळून ज्ञान मिळते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ही ज्ञानग्रहण प्रक्रिया सुरूच असते. जो तो आपल्या आवडी निवडीनुसार ज्ञानग्रहण करीत असतो. कोणीतरी शिकवतो तेंव्हा ज्ञान मिळते. आणि कोणी न शिकवताही ज्ञान मिळते. ज्ञान आपोआप सहजच मिळत असते. पण मिळालेल्या ज्ञानातील सत्य शोधण्यासाठी मात्र अभ्यास करावा लागतो. कोणीतरी काहीतरी ज्ञान सांगत असतो. पण ते ज्ञान खरे कसे मानायचे? त्यासाठीच अभ्यास करायचा असतो. मला शिकायचे नाही असे कोणी म्हणूच शकत नाही. कारण शिकणे ही नैसर्गिक क्रिया आहे. एखाद्या गोष्टीवर विचार करणे, त्यातून प्रश्न निर्माण होणे आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे अभ्यास. माहित नसलेली एखादी गोष्ट आपण दुसऱ्याला विचारतो. रस्ता चुकला असे वाटते तेंव्हा आपण एखाद्याला रस्ता विचारतो आणि पुढे जातो. हेही ज्ञानच. जगणे सोयीस्कर करण्याच्या विचारातून काही शोध लागले हेही ज्ञान. आणि आजची टेक्नॉलॉजी म्हणजेही ज्ञानच. न्युटनच्या म्हणण्यानुसार एखाद्या गोष्टीचे ज्ञान मिळणे म्हणजे ते अथांग सागर किनाऱ्यावर पसरलेल्या वाळूतील एका कणाप्रमाणे आहे. हे आज सिद्ध झाले आहे. विचारानुरूप आवडीचा विषय ठरतो आणि अभ्यासाला सुरुवात होते. आवडीच्या विषयाचाच अभ्यास आवडीने होतो. पण कोणाला काय आवडेल याचा नेम नसतो. काहीच आवडत नाही असा मात्र कोणीच नसतो. नुसती आवड असूनही चालत नाही. त्या आवडीचे रुपांतर काहीतरी साध्य करण्यासाठी नियमित अभ्यास, नियमित सराव हा करावाच लागतो. शेवटी अभ्यास करून प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा हे अनुभवानेच माणूस शिकत असतो. अंतिम साध्य हे समाधान, शांती, यश किंवा पैसा यापैकी कशात आहे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे. आजची आवड हेच उद्याचे करियर आहे, उद्याचे जीवन आहे हे मात्र नक्की. तात्पर्य मुख्य मुद्दा ज्ञानाचा आहे. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानातील माध्यमातील इंटरनेट हा आपला विषय आहे. आणि तो कधीही न संपणारा आहे. इंटरनेट म्हणजे कधीही न संपणारा तरीही दिवसेंदिवस वाढत जाणारा ज्ञानाचा महासागर आहे. यात सर्वज्ञ कोणीच नसतो. म्हणून अनेक इंटरनेट गुरूंचा समूह करून शिका आणि शिकवा या न्यायाने सर्वांनी मिळून अभ्यास करण्याचा माझा उद्देश आहे. जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे. शहाणे करून सोडावे सकलजना या उक्ती प्रमाणे. इंटरनेटच्या महाजालात खोदकाम अर्थात शोधकाम करणाऱ्याला काहीना काही सापडताच असते ते सारे ज्ञानच असते. प्रत्येकाला सापडलेले वेगवेगळे ज्ञान आपण एकमेकांना वाटले तर कोणीच मागे राहणार नाही. म्हणूनच आम्ही सुरु केलेल्या या इंटरनेट साक्षरता अभियानात सहभागी व्हा. एक वाचक, शिक्षक (इंटरनेट गुरु), वर्गणीदार, जाहिरातदार, एजंट, डिस्ट्रिब्युटर्स, हितचिंतक किंवा मार्गदर्शक अशा कोणत्याही भूमिकेत या. इंटरनेट गुरु परिवारात आपले स्वागत आहे.