इंटरनेट : ज्ञानप्राप्तीचा बोधीवृक्ष

शाक्य नरेश शुद्धोधन यांच्या घरी इ. स. पूर्व ५६३ साली जन्मलेल्या सिध्दार्थने आपले नवजात बालक राहुल आणि पत्नी यशोधन यांचा त्याग केला, आणि दु:खापासून मुक्ती मिळणाऱ्या मार्गाच्या शोधात जंगलात निघून गेले. कित्येक वर्षाच्या कठोर साधनेनंतर बोध गया (बिहार) मध्ये बोधी वृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ते सिधार्थचे गौतम बुद्ध झाले. हा झाला सुमारे दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास. ज्ञान मिळवणे ही शतकानुशतके चालत आलेली परंपरा आहे. कारण ज्ञान हेच जीवनाचे सार आहे. ज्ञानाच्या जोरावरच आज अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होत आहेत, आणि ज्ञान हे यापुढेही असेच चालत राहणार आहे.

बोधी वृक्षाखाली गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली हे आम्ही शाळेत शिकलो आणि त्यावेळी वाटलेही आपणही शाळेत जाण्याऐवजी जंगलात जाऊन एखाद्या झाडाखाली का बसू नये? मुळात ज्ञान म्हणजे काय तेच कळत नव्हते. असो, पण आजची परिस्थिती वेगळी आहे, ज्ञान प्राप्तीसाठी आज ना शाळेत, ना जंगलात जाण्याची गरज आहे. ना एखाद्या आश्रमात जाण्याची गरज आहे. कारण ज्ञानप्राप्तीसाठी इंटरनेट नावाचे झाड कुणीतरी लावले आणि बघता बघता त्या झाडाने साऱ्या विश्वालाच वेढून टाकले. ज्ञानाच्या असंख्य फांद्या प्रत्येकाच्या घरात घुसल्या आहेत. झाडाखाली बसण्याच प्रश्न येतोच कुठे ? घरात बसा. बाहेर जा. हे इंटरनेटचे झाड तुमच्या बरोबरच फिरत असते. असंख्य ज्ञानाची फळे लागलेले हे झाड तुमच्या जवळच आहे. या झाडाला लागलेली ज्ञानाची फळे अगदी हाताने तोडून खाण्यासारखी आहेत. पण या एकाच झाडाला दु:खापासून मुक्ती देणारी आणि दु:खात लोटणारी दोन्ही प्रकारची फळे असतात. अगदी निरखून पारखून इथे ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असते. आम्ही नेहमी म्हणतो ज्ञान ज्ञान असते. ज्ञानाला चांगले वाईट कळत नाही. चांगले वाईट हे ते ज्ञान वापरणाऱ्याने ठरवयाचे असते. इंटरनेटच्या झाडाला विविध प्रकारच्या ज्ञानाची असंख्य चांगली वाईट फळे लागलेली आहेत. त्यातील जास्तीत जास्त चांगल्या ज्ञानफळांची प्राप्ती तुम्हला करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही स्वतः इंटरनेट वृक्षाच्या सहवासात राहा. हा इंटरनेटचा बोधी वृक्ष तुम्हाला हवी ती सर्व ज्ञानप्राप्ती नक्की करून देईल.

Leave a Reply